आमदारांच्या पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षांचा राजीनामा

मुळशीत राजकीय घडामोडींना वेग, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य

घोटवडे : मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी (अजितदादा पवार) पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिला असून निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.

     राष्ट्रवादी पक्षाचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष आनंदा नारायण घोगरे यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांच्याजवळ सुपूर्द केला आहे.

     या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, "पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षाचे काम करत आलेलो आहे. तरीदेखील घोटवडे गावाला पक्षाने पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये योग्य न्याय दिला नाही. ज्यांनी खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या विरोधात काम केले व त्यांचा पराभव झाल्यानंतर माझ्या कार्यालयासमोर व पुणे जिल्हा सहकारी बँक घोटवडे शाखेसमोर, फटाके वाजवून आनंद साजरा केला. अशा लोकांना पक्षात घेऊन अवास्तव महत्व दिले जात आहे. या गोष्टीवर नाराज होऊन मी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करावा!"

     तथापी आमदार शंकर मांडेकर यांच्या राष्ट्रवादी (अजितदादा पवार) पक्षाला नाराजीचा पहिला फटका पडला आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक नाराजीनाट्य रंगणार असल्याच्या तालुक्यात चर्चा आहेत. तरी नाराजीनाट्याला सामोरे जाताना आमदार शंकर मांडेकर व राष्ट्रवादी पक्षाची दमछाक होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

     याबद्दल राष्ट्रवादी (अजितदादा पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांना या राजीनाम्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की आम्ही आमदार शंकर मांडेकर व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मध्यस्थीने या राजीनाम्यावर पुढील निर्णय अन कार्यवाही करणार आहोत.

 कोण आहेत आनंदा घोगरे ?

     आनंदा घोगरे हे घोटवडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत. त्यांनी आपल्या सरपंच काळात विकासकामांचा मोठा धडाका राबवला होता. राष्ट्रवादी पक्षाचे ते एकनिष्ठ सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत.

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k