जिगरबाज पोलीस उपनिरिक्षक नंदराज गभाले यांना 'आंतरिक सुरक्षा पदक' जाहीर

नक्षलीभागात केलेल्या विशेष कार्याचा गौरव



पिंपरी चिंचवड (विशेष प्रतिनिधी) :  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सेवा बजावत असणारे जिगरबाज अधिकारी पोलीस उपनिरिक्षक नंदराज तुकाराम गभाले यांना केंद्र सरकारकडून आंतरिक सुरक्षा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले. गडचिरोली मधील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम भागात केलेल्या विशेष कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.


             अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने शिक्षण पुर्ण करून मोठ्या बहिणीचा आदर्श घेत गभाले हे सन २००५ साली पोलीस दलात भरती झाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई येथे फोर्स वन दलात २००९ ते २०१३ कालावधीत यशस्वीपणे सेवा बजावली. नंतर, पोलीस उपनिरिक्षक पदाचे ट्रेनिंग पुर्ण होताच २०१४ मध्ये गडचिरोली येथील अतिदुर्गम भागात नियुक्ती करण्यात आली. फोर्स वन दलाचा अनुभव असल्याने सहा महिन्यातच गभाले यांनी प्रभारी पदाचा कार्यभार स्विकारून स्थानिक पोलीस ठाणे तसेच परिसरातील आठरा गावांचा कायापालट करत मुख्य प्रवाहात आणले. अतिसंवेदनशील भागात गावोगावी, वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना विश्वासात घेऊन नक्षलविरोधी मोहीम आणखीन बळकट केली.


             सन २०१६ मध्ये नक्षलींसोबत झालेल्या फायरिंग मध्ये जिगरबाज कामगिरी बजावत एका नक्षल सदस्याला अटक करून थेट चंद्रपूर कारागृहात रवानगी केली. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने नक्षली हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच नागरिकांशी सतत संपर्कात राहण्यात प्रचंड अडचणी येत होत्या,  त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय पाठपुरावा करून फेब्रुवारी २०१७ साली अतिदुर्गम भागात भारत संचार निगम लिमिटेडचा टॉवर बसविण्यात आला. यामध्ये गभाले यांची भुमिका महत्त्वाची होती. हद्दीतील किष्टापुर येथे नाल्याला पुर येत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथील २२ गावांचा संपर्क तुटत होता. सदर नाल्यावर पुल बांधण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी मंजूर करण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. नक्षलीविरोधी मोहीम प्रबळ करण्यासाठी अति संवेदनशील भागात तब्बल ३५०० नागरिकांना एकत्र करुन यशस्वी मेळावा घेतला. तसेच नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सुविधांची माहिती देऊन गावोगावी जनजागरण मेळावे आयोजित केले.


             सन २०१४ ते २०१७ कालावधीत उपनिरीक्षक नंदराज गभाले यांचे नक्षलग्रस्त भागातील महत्वपूर्ण योगदान आणि जिगरबाज कामगिरीसाठी त्यांना नुकतेच केंद्र सरकारकडून अंतरिक सुरक्षा पदक जाहीर करून सन्मानित करण्यात आले. गडचिरोली भागात यशस्वीपणे सेवा पुर्ण केल्यानंतर त्यांची पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली गभाले सध्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपनिरिक्षक पदावर कार्यरत आहेत.


Click करा - मुळशीकरांसाठी कोरोनाबाबत महत्वाची आहे ही बातमी, तुम्ही पहिली का...?


गभाले यांचे भाऊ आणि बहिण सुद्धा पोलीस दलात अधिकारी


             गभाले यांचे भाऊ आणि बहिण सुद्धा पोलीस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झालेले जिगरबाज पोलीस अधिकारी उपनिरिक्षक नंदराज गभाले यांना यापूर्वी फोर्स वन दलातील यशस्वी कामगिरीसाठी 'विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.  नुकतेच केंद्र सरकारकडून अंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.