दिवाळीपूर्वीच मुळशीत फुटणार फटाके...?
मनचाहे आरक्षण पडताच उमेदवारांकडून होणार जल्लोष?
पौड : मुळशी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूक आरक्षणाकडे डोळे लावून वाट बघत बसलेल्या अनेकांची प्रतीक्षा आज संपणार आहे. गेल्या साडे आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नव्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होत असल्याने कुठेतरी उमेदवारांच्या छातीत धडधड होत आहे. आरक्षण मनासारखे पडणार की नाही यासाठी धाकधूक वाढली आहे. पण मनासारखे आरक्षण पडताच उमेदवारांकडून फटाके फोडून दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची चिन्ह काही मतदारसंघात दिसत आहेत.
       तब्बल साडेआठ ते नऊ वर्षांनी मुळशी पंचायत समिती व जिल्हा परिषदसाठी निवडणुकीसाठी आरक्षण पडत असल्याने राजकीय क्षेत्रात बरीच उलथापालथ होत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही राजकीय होळीने साजरी होणार असल्याची शक्यता आहेत. मतदारांपर्यंत आपली छबी तयार करण्यासाठी उमेदवार चांगलीच धडपड करत आहेत. ही धडपड यशस्वी व्हावी व मनासारखे आऱक्षण पडावे यासाठी ईच्छुक उमेदवारांकडून देवाला साकडं घालण्यात आलेलं आहे.
   मुळशीत 6 पंचायत समिती गण तसेच 3 जिल्हा परिषद गट आहेत. पौड, पिरंगुट व हिंजवडी असे तीन जिल्हा परिषद गट असून पौड, अंबडवेट, माण, हिंजवडी, पिरंगुट, भुगाव असे 6 पंचायत समिती गण आहेत. मुळशीतील बावधन, सुस, म्हाळुंगे ही 3 गावं पुणे शहरात गेल्याने प्रभागरचना आमुलाग्र बदलली आहे. त्यामुळे बावधन ऐवजी भुगाव व आंबवणे ऐवजी अंबडवेट हे दोन नवे पंचायत समिती गण तयार केले आहेत. पौड गाव आंबवणे गणात घेऊन त्याला पौड गण हे नाव देण्यात आले आहे. तर पिरंगुट गाव हे भुगाव व पिरंगुट गणात विभागले गेले आहे.

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k