महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन वितरणाचा नियम, माहिती अधिकारात झाले उघड
पौड : रेशनिंग वितरणात दुकानदारांकडून होणाऱ्या मनमानीला आळा घालण्याचे काम पुरवठा विभागाला करावे लागणार आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशनिंग वितरण करण्याचा शासनाचा नियम असून तो रेशन दुकानदारांकडून सर्रास धाब्यावर बसवला जात आहे. शिवाय रेशनिंग वितरकांच्या म्हणण्यानुसार व त्यांच्याच वेळेत रेशनिंगसाठी रांगा लावून गर्दी करावी लागत आहे.
मुळशी तालुक्यात रेशनिंग वितरणाबाबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. आम्हाला रेशनिंगसाठी दोन-तीन दिवसच बोलावले जाते, त्यानंतर रेशनिंग मिळत नाही, दिले जात नाही. त्या दोन-तीन दिवसांतच रेशन नेणे बंधनकारक केले जाते. मग त्यामुळे अनेक ठिकाणी रेशनिंगसाठी रांगा लागत असून ग्राहकांचा नाहक वेळ जात आहे. शिवाय प्रत्येक ग्राहकाची बायोमेट्रिक चाचणी व्हायला देखील मशीनचे नेटवर्क, अंगठ्यावर पुसट झालेले ठसे यामुळे अधिकच वेळ जात असल्याने रेशनिंग आणणे हे मोठे दिव्य होऊन बसते. अनेक ठिकाणी पती-पत्नी रोजगारासाठी कामावर जात असल्याने रेशन आणण्यात अडथळा होत असून वेळेअभावी रेशन नेता येत नाही. त्यामुळे रेशन धारकांची कुचंबना होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार रेशन वितरण करण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची आहे. मात्र पुरवठा विभाग जातीने या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. पुरवठा विभागाने प्रत्येक रेशन दुकानदाराला शासनाची नियमावली समजावून सांगून त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा सक्त आदेश दिला पाहिजे. शिवाय शासन नियम प्रत्येक रेशन दुकानाबाहेर फलकावर लावले गेले पाहिजेत, तसे लावले गेले नसतील तर त्या दुकानांवर कारवाई करण्याचे काम पुरवठा विभागाने करावे. मात्र ते होत नसल्याने लोकांची अडचण होत आहे.
लोकांची होणारी अडचण व कुचंबना पाहून शासनाच्या पुरवठा विभागाला माहिती अधिकारात माहिती विचारली गेली होती. त्यानुसार महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानामध्ये रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असे न केल्यास त्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली.
रेशन दुकानाबाहेर असावेत फलक, त्यावर असावी पुढील माहिती
रास्तभाव (रेशन) दुकानदारांनी दुकानाबाहेर फलक लावून त्यात पुढील गोष्टी नमूद करणे बंधनकारक आहे. या फलकावर १) लक्ष्य निर्धारित लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, २) किरकोळ विक्रीचे मूल्य, ३) अन्नधान्याची पात्रता, ४) रास्तभाव दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ, ५) भोजनाची वेळ, ६) अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, ६) काही तक्रार असल्यास ती कोणत्या अधिकऱ्याकडे करावी याची माहिती, ७) तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक व हेल्पलाईन याची माहिती फलकावर लावावी. ही माहिती व फलक नसल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी व नियंत्रक, शिधावाटप यंत्रणा यांनी खात्री करून व त्याचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असा शासन आदेश आहे.
रेशन वितरणासाठी असलेले नियम, माहिती अधिकारात मिळालेली माहिती
रास्तभाव दुकानांसाठी रेशनचे सुस्थितीत वितरण होण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. यामध्ये ही रास्तभाव (रेशन) दुकाने सकाळी ४ तास व संध्याकाळी ४ तास निश्चितपणे उघडी ठेवावीत. स्थानिक परिस्थितीनुसार याबाबतच्या नेमक्या वेळा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी, नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांनी निश्चित कराव्यात. ज्याठिकाणी आठवडी बाजार भरत असेल अशा ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी रास्तभाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत. विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी रास्तभाव, शिधावाटप दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत. या नियमावलीचे मुळशीत तंतोतंत पालन होते का मुळशी तहसीलच्या पुरवठा विभागाने पाहिले पाहिजे व तसे नसेल तर कारवाई करायला पाहिजे.
रेशनिंग दुकानदाराला ऑनलाईन वाटपाप्रमाणे प्रति क्विंटल (१०० किलो) १५० रुपये म्हणजे प्रति किलो दीड रुपया असे कमिशन दिले जाते. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेकरता प्रति व्यक्ती गहू २ किलो व तांदुळ ३ किलो तसेच अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकास प्रति व्यक्ती गहू १५ किलो व तांदूळ २० किलो याप्रमाणे धान्य मिळते.
लवकरच सर्व रेशनिंग दुकानदारांना योग्य त्या सुचना देणार
सर्व रेशनिंग दुकानदारांची लवकरच बैठक होईल. या बैठकीत नियमांचे काटेकोर पालन करावे, ग्राहकांना त्रास देऊ नये, सहकार्य करावे आणि अन्नधान्य वितरण सुरळीत पार पाडावे अशा सूचना देण्यात येतील.
- अपर्णा वढूरकर (निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग - मुळशी)
रेशन वितरित करण्यात दुकानदारांना अडचणी
रेशनिंग दुकानदारांना तसे रेशन वितरित करणे परवडत नाही, मिळणारे अल्प कमिशनही १०-१० महिने रखडते. त्यामुळे रेशनिंग दुकानदारांना त्रास होतो. तसेच रेशनिंग दुकानदारांनी लोकांना रांगेत उभे नाही केले पाहिजे. टप्प्याटप्प्यानुसार लोकांना रेशनिंग न्यायला बोलवावे.
अनेकदा लोकांना फोन करून पण लोकं रेशनिंग न्यायला येत नाहीत, कधी कधी तर घरी जाऊन पण अंगठा घ्यावा लागतो. बरेच लोकं इकेवायसी करत नाहीत, त्यामुळे रेशनिंगचं धान्य बंद होऊ शकतं, बंद होतं.
आमच्याकडे बायोमेट्रिक (अंगठा मशिनला लावणे) कधी कधी होत नाही, मग अशा वेळी आम्ही मोबाईल ओटीपीचा वापर करतो, कधी कधी डोळे देखील स्कॅन करून ग्राहकांना धान्य देतो. यासारखे पर्याय सर्व रेशनिंग दुकानदारांनी वापरावेत. तर कधी धान्य शिल्लक असेल तर पोर्टबिलिटीचा वापर करून दुसऱ्या भागातील गरजू कोण आला तर त्यालाही त्याच्या हक्काचे रेशनिंग दिले जाते, मात्र सर्वप्रथम प्राधान्य स्थानिक रेशनिंग धारकलाच दिले जाते.
- सिद्धेश्वर पांढरे (सहसचिव - मुळशी तालुका रेशन संघटना)
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.