मुळशीतील ६ गावांनी महानगरपालिकेत जाण्यास एकजुटीने विरोध करावा, काँग्रेसचे आवाहन
हिंजवडी : मुळशीतील गावं महानगरपालिकेत समाविष्ट न करता त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, या मागणीसाठी मुळशी तालुका काँग्रेसने हिंजवडी येथे आंदोलन केले. हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी मुळशी तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी व हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की, पुणे महानगर पालिकेत जी ३४ गावं समाविष्ट केली आहेत, अजून त्यांना मुलभूत सुख सुविधा मिळाल्या नाहीत. त्या न देता महानगरपालिकेने जाचक कर सर्वसामान्य नागरिकांनावर लावला आहे. त्यामुळे हिंजवडी, माण तसेच बाजूच्या गावांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विळखा या गावांभोवती बसण्यापूर्वी एकजुटीने याला विरोध करावा.
यावेळी बोलताना मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पारखी यांनी म्हणाले की, हा मुळशी तालुक्याचा अस्मितेचा विषय आहे व हिंजवडी आयटी पार्कच्या रूपाने जगभरामध्ये मुळशी तालुक्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे हिंजवडी, माण व बाजूची गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास आमचा विरोध आहे. आम्ही शासनाला मुळशी तालुक्याचा एकसंध नकाशा बदलू देणार नाही.
मुळशी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन किर्वे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुळशी तालुक्याला सेनापती बापट यांच्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी आहे. शासनाने जर ही गावे महानगर पालिकेत घेण्याचा घाट घातला तर मुळशीकर बांधवांना बरोबर घेऊन पुन्हा आम्ही सत्याग्रह करू. त्यामुळे शासनाने हिंजवडी, माण व बाजूच्या गावांची स्वतंत्र नगरपालिका करून आयटी पार्कचा मिळणारा महसूल, तसेच एक विशेष अध्यादेश जारी करून या परिसरातील कंपन्यांचे सीएसआर फंड या नगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्याचे बंधन घालावे.
या आंदोलनास हिंजवडी-माण गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेशभाऊ निकाळजे, भोर विधानसभेचे अध्यक्ष एकनाथ खोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक अध्यक्ष समीर बुचडे, पिरंगुटचे माजी सरपंच मोहन गोळे, काँग्रेसचे युवा नेते सतीश चांदेरे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिग्विजय हुलावळे, तचेच राहुल ओझरकर, काँग्रेसचे मुळशी तालुका उपाध्यक्ष मधुसूदन पाडाळे, पत्रकार विनायक गुजर, राम ओझरकर, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष प्रदीप जाधव, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार रमेश पानसरे , मल्हारी बोडके, नथुराम बोडके उपस्थित होते.यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.