गट शिक्षणाधिकारी पण भेटेना, तर पूर्वी गटविकास अधिकाऱ्यांना देखील काम करू दिले जात नव्हते
पौड : मुळशी तालुक्याची प्रशासनाकडून सतत अवहेलना सुरू आहे. प्रशासनाच्या दृष्टीने मुळशी तालुक्याला फारच गौण समजलं जातंय. गेल्या एक महिन्यापासून मुळशी तालुक्याला तहसीलदार पदावर हक्काचा माणूस बसत नसल्याने मुळशीकर जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे.
एक महिना होत आलाय, मुळशीच्या तहसीलदारपदावर अधिकृत उमेदवार नाही. सध्या तात्पुरता भार दुसऱ्या अधिकाऱ्यांवर दिला असून त्यांनाही दुसरीकडचा पदभार असल्याने तालुक्यासाठी ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मुळशीतील अनेक कामे रखडली आहेत. अनेक सुनावणीच्या तारखा पडत असून महिनाभरापासून बराचसा कार्यभाग थांबला आहे. याबाबत मुळशीकर नागरिकांची म्हणावी तशी ओरड होत नसल्याने प्रशासन पण सुस्त होऊन मुळशीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत बसले आहे.
तहसीलदार पदावर शासनाने ३० जून रोजी नवीन नियुक्त केली. त्यानंतर नियुक्त केलेल्या नव्या तहसीलदार मॅडम आजपर्यंत अधिकृत रित्या पदावर कार्यन्वित झालेल्याच नाहीयेत, यामागे कोणते राजकारण आहे? कोणाची खेळी आहे हे सर्वसामान्य जनतेला समजत नाहीये. पण प्रशासन मुळशीकर नागरिकांना वेठीस धरत आहे, आणि याला शांत असणारे मुळशीकरच जबाबदार आहेत.
तहसीलदार तर मुळशीला मिळेनातच पण मुळशी पंचायत समितीमध्ये गट शिक्षणाधिकारी देखील मिळत नाहीये. गेल्या ४-५ महिन्यांपासून गट शिक्षणाधिकारी मुळशी तालुक्यापासून अलिप्त असून त्यांना कामकाजापासून रोखलं होतं की आणखीन काही माहीत नाही, पण त्यांना कसल्यातरी प्रशिक्षणाला पाठवलं असं सांगितलं जात होतं. एक महिन्यापासून त्यांची बदली होऊन तात्पुरता भार सहाय्यक गटविकास अधिकारी भालेराव यांच्याकडे दिलेला आहे. पण पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी तालुक्याला भेटत नाहीये. मुळशीतून जाब विचारणारे कोण नाहीत म्हणून असे होत आहे.
याआधीही मुळशीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नेमणूक करण्याकरता शासनाने बराच काळ घालवला होता, मागच्या दोन्ही वेळेस असे झाल्याने मुळशीची गैरसोय शासनाकडून मुद्दामून केली जात आहे, असे वाटतेय. शिवाय मूलभूत शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) मध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचा तर प्रकार नाही ना, अशी शंका सर्वसामान्य नागरिक घेत आहेत.
सध्याचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना सुरवातीच्या काळात मुळशीत काम करू दिलं जात नव्हतं. कारण मुळशीच्या गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतरही त्यांना मावळ तालुक्याच्या गटविकास अधिकारी पदाचा तात्पुरता भार देण्यात आला होता. यामुळे तेथील स्थानिक आमदार अनेकदा नव्हे बऱ्याचदा त्यांना मावळमध्ये उपस्थित राहण्यास आणि काम करण्यास भाग पाडत असे, परिणामी ते मुळशीला फारच थोडा वेळ देत होते. सारखं मावळला काही ना काहीतरी चालू असायचं. याऊलट इथले तत्कालीन आमदार संग्राम थोपटे असे काही बंधन लादत नव्हते. त्यामुळे अनेक महिने मुळशीला गटविकास अधिकारी नीट लाभलेच नाही. तरी पंचायत समिती सदस्य निवडणूक न झाल्याने रिक्त असल्याने सर्वच भार गटविकास अधिकाऱ्यांवर आला होता, तरी देखील मुळशीची अवहेलना सुरूच होती. आताही तहसीलदार पदाबाबत तशीच काही अवहेलना सुरू आहे.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.