मुळशीत भातशेती धोक्यात, शेतकरी हवालदिल

सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाच्या झळा

पौड : सततच्या पावसामुळे मुळशी तालुक्यात भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून ६० ते ७०% भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ओल्या दुष्काळाच्या झळांनी भातशेतीचे कंबरडे मात्र मोडणार आहे.

         यावर्षी मान्सूनने वेगळा पवित्रा घेत एक महिना आधीच पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे मेच्या मध्यातच पाऊस सुरू झाला व मेच्या अखेर सुरू होणारी भातपेरणी रखडली. भात पेरणी करायला शेतं वाफशावर न गेल्याने भात पेरणी होऊ शकली नाही. तर ज्यांनी भात पेरणी केली ती सततच्या पावसामुळे पाण्यात भिजून, वाहून व गेल्याने धोक्यात आली आहे. तर काही ठिकाणी भाताचे बेणं कुजून गेले आहे. थोडीफार भात पेरणी फक्त उगवत आहे.

         पावसाने उघडीप दिली नाहीतर भातशेतीचे भयंकर नुकसान होणार आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरणार आहे. भातशेतीचे उत्पादन यंदा निम्म्याहून अधिक घटेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतं वाफशावर नसून पाण्यात बुडाल्याने अनेक शेतकऱ्यांची भात पेरणी राहिली आहे.

शेतकऱ्यावर अस्मानी संकट

       कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाच्या झळांनी अस्मानी संकट ओढवले आहे. मुळशी तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी मुख्यत्वे भात पीक घेतात. भात शेतीच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळशी धरण परिसर, कोळवण खोरे, रिहे खोरे, मुठा खोरे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भात शेती होते. या सर्व खोऱ्यातील नागरिकांना भातशेतीचाच मुख्य आधार आहे. हा भाग सोडला तर मुळशीच्या इतर पट्ट्यात बागायती शेती देखील आहे. ओल्या दुष्काळाच्या झळांमुळे कोरडवाहू आणि बागायती दोन्ही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तांदळाच्या किमती विक्रमी होणार ?

       भातशेती अशीच धोक्यात राहिली तर तांदळाच्या किंमती यावर्षी सर्व विक्रम मोडून उच्चांकी राहणार आहेत. तांदळाच्या किंमती गगनाला भिडणाऱ्या ठरू शकणाऱ्या असतील तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. सर्वसामान्य लोकांचं बजेट मात्र बिघडणार असून तांदळाचा पुरवठा अपुरा पडणार आहे. ही सगळी शक्यता वर्तवली जात असून पावसाने उघडीप द्यावी, अशी शेतकरी मनोमन प्रार्थना करत आहेत.

...............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k