मुळशीत प्रशासनाने घेतला मान्सून पूर्व आढावा

आपत्ती काळात अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा नको – प्रांताधिकारी सुरेंद्र नवले

पौड : मुळशी तालुक्यात प्रशासनाकडून मान्सून पूर्व आढाव बैठक घेण्यात आली. मुळशी पंचायत समिती येथील सेनापती बापट सभागृह येथे सर्व शासकीय विभाग प्रमुखांसोबत नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत  सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील असणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजनांची माहिती मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले व मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना दिली.

     मुळशीमधील नैसर्गिक आपत्तीकाळात प्रामुख्याने महावितरणचा विद्युत पुरवठा शक्यतो खंडित होऊ नये याची खबरदारी घ्यावी. जर विद्युत पुरवठा खंडीत  झाला तर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्ते दुरुस्त करून घेणे. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी आरोग्याच्या उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी आपत्तीच्या ठिकाणी तातडीने उपस्थित राहणे गरजेचे आहे. आपत्तीची माहिती मिळण्यासाठी कोतवाल, पोलीस पाटील यांना सूचना द्याव्यात, जेणेकरून मदत लवकर पोहचेल अशा प्रत्येक विभागाला विविध सूचना देण्यात आल्या.

     सध्या चाले पुलाचे काम अर्धवट झाले असल्याने पर्यायी तयार करण्यात आलेला पूल पाण्याखाली गेला होता. याकरिता कोळवण खोऱ्यातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी पर्यायी मार्गावर चाले-मुगावडे-घोटावडे-अंबवेट-दारवली-पौड रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे व साईड पट्टी तयार करत असल्याचे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तर चाले पुलाचे काम 20 जून पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अचानक पाऊस आल्याने नदीत पाणी वाढल्यामुळे काम करता येत नाही. तथापी पाणी कमी झाल्यावर पुन्हा काम सुरु करता येईल, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आल आहे.

     सर्व विभाागांनी कोणत्या समस्या आहेत व त्यावरील उपाय योजना काय करता येईल याची माहिती लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन नवले व भोसले यांच्याकडून करण्यात आले.

     यावेळी मावळ-मुळशी उपविभागीय प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार रणजित भोसले, मुळशीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस मनोज कदम, नायब तहसिलदार अमित कदम, तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक स्वप्ना पाटील, पौडचे दुय्यम निबंधक एम.व्ही.क्षीरसागर, बंडू कुबडे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     पावसाळ्यात रुग्णवाहिका कायम तयार असली पाहिजे. याबाबत धर्मादाय रुग्णालयात तितकी तत्परता पाळत नसल्याने शासन याबाबत गंभीर दृष्टिकोनातून पाहते. तसेच या मान्सूनमध्ये सिम्बॉयसिस हॉस्पिटलकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. येणाऱ्या सर्व पेशंटची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, असे सुरेंद्र नवले उपविभागीय अधिकारी, मावळ मुळशी यांनी सिम्बॉयसिस हॉस्पिटल व्यवस्थापन प्रतिनिधी यांना सांगितले.

शेतकऱ्यांनी दगावलेल्या जनावरांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट तयार करावा

     शेतकऱ्यांनी जनावरं दगावल्यानंतर त्याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट तयार करवून घ्यावा, तो करणं बंधनकारक असून त्यानंतरच नुकसान भरपाई त्यांना मागता येईल. पोस्ट मार्टम रिपोर्ट नसेल तर नुकसान भरपाई मागता येणार नाही.

बैठकीस अनुपस्थितीतून अधिकाऱ्यांची उदासिनता

     मान्सूनपूर्व आढाव बैठकीस सर्वात महत्त्वाच्या पुणे-कोलाड महामार्ग रस्त्याबाबत एमएसआरडीसीची उदासीनता दिसून आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा एकही अधिकारी किंवा पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हता. तसेच अनेक विभागाचे मुख्य अधिकारी उपस्थित न राहता, त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्याने अधिकाऱ्यांची उदासीन मानसिकता दिसून आली.

...............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k