मुळशीतल्या लवळे येथील शाळेत नागपंचमीनिमित्त संवाद सर्पमित्रांशी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना धडे
लवळे : नागपंचमी सणानिमित्त लवळे, ता.मुळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संवाद सर्पमित्रांशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विविध सर्पांची ओळख तसेच त्यांच्याविषयी माहिती देवून साप वाचवणे हे पर्य़ावरणासाठी किती आवश्यक आहे याची सचित्र माहिती देण्यात आली. “सापांना वाचवा अंधश्रद्धा टाळा”चा संदेश यानिमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी लवळे गावातील सर्पमित्र गणेश मारणे व
सुनील शिर्के यांनी सापाविषयीची भीती तसेच अंधश्रद्धा दूर करत सापांविषयी माहिती
दिली. महाराष्ट्रातील बिनविषारी साप, चार विषारी साप घोणस, मण्यार, नाग व फुरसे हे कसे दिसतात, कोठे आढळतात, सर्पदंश झाल्यावर
घ्यावयाची काळजी या विषयाची सविस्तर
माहिती सर्पमित्र गणेश मारणे यांनी दिली. विषारी सापांच्या भीतीमुळे अनेकदा
बिनविषारी सापदेखील मारले जातात, यासाठी जनजागृती गरजेची आहे.
साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे तसेच
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साप मारू नका सापांना वाचवा असा संदेश
देण्यात आला. मी सापांना मारणार नाही व कोणाला मारू देणार नाही अशी प्रतिज्ञा
शाळेचे पदवीधर शिक्षक संगीता कुलकर्णी व परमेश्वर जाधव यांनी मुलांकडून घेतली.
यावेळी माजी सरपंच संजय सातव, मुख्याध्यापक नंदा खोमणे, संजय मारणे व शालेय
व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश आल्हाट यांनी सर्पमित्र गणेश मारणे व सुनील शिर्के या दोघांचे
स्वागत केले. शाळेतील सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सर्पांविषयी माहिती जाणून घेतली.
शाळेतील बापूराव पवार, रवींद्र डोळसे, ज्योती भगत, सुवर्णा पासलकर, शिवलिंग स्वामी, कल्पना थेऊरकर,
उज्वला नारायणकर, सचिन इंगळे, स्वाती इंगळे, दीपाली इंदुरकर, मनीषा मालुसरे, सरिता ननावरे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
सर्पमित्र हे रात्री-अपरात्री नागरिकांच्या
सेवेसाठी नेहमीच उपस्थित असतात. नागरिकांच्या घरातले साप पकडून विनामूल्य ते त्या
सापांना निसर्गात सोडण्याचे काम करत आहेत. घरात साप निघाल्यास आपण सर्पमित्रांशी
संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सर्पमित्राचा संपर्क क्रमांक शाळेच्या
दर्शनी भागात सर्पमित्र आपत्कालीन क्रमांक लावण्यात आला आहे. पदवीधर शिक्षिका
शुभांगी निघोट यांच्या संकल्पनेतून संवाद सर्पमित्रांशी हा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.