प्लॉटधारकांच्या रस्त्यासाठी जामगाव ग्रामपंचायतीमध्ये बोगस ठराव

सरपंच विनोद सुर्वेंनी आणले उघडकीस, माजी सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याचे बीडीओंचा आदेश




पौड : जामगावच्या डोंगरावर खाजगी प्लॉटधारकांना रस्ता वापरण्यासाठी माजी सरपंचांनी बोगस ठराव करून बेकायदेशीर ना हरकत दाखला दिला. अशी तक्रार येथील विद्यमान सरपंच विनोद सुर्वे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी ग्रामपंचायत दफ्तर तपासणी केली असता माजी सरपंच अलका शंकर ढाकुळ यांनी ग्रामपंचायतीत असा कोणताही ठराव घेतला नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सरपंच सुर्वे यांना माजी सरपंच ढाकुळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

     माजी सरपंचांनी ग्रामपंचायतीत बोगस ठराव करून खाजगी प्लॉटधारकांना रस्त्यावरून जाण्यासाठी बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र दिले. ४ महिन्यांपुर्वी जनतेतून थेट सरपंच झालेल्या विनोद सुर्वे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची दखल घेत मुळशीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यातून हा ठरावच बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने भागवत यांनी सुर्वे यांना माजी सरपंच अलका ढाकूळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

     जामगाव येथील डोंगर परिसरावर ५० एकरपेक्षा जास्त जागेवर ५ खाजगी कंपन्यांनी प्लॉटिंग केले आहे. या ठिकाणी प्लॉटिंगवर जाण्यासाठी गावचा असलेला रस्ता प्लॉटिंगधारक कंपन्यांना वापरता येईल असे बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र दिले गेले. मात्र यासाठी आवश्यक असलेली कोणतीच कार्यवाही न करता तसेच ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी, ठराव वा नोंदही घेतली गेली नाही.

     या बेकायदेशीर ना हरकत परवान्यामध्ये गावचा रस्ता या प्लॉटिंग धारकांना कायमस्वरूपी वापरण्यासाठी देण्यात येत आहे. तसेच यापुढे निवडून येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कमिटीला हा निर्णय बंधनकारक राहील व ग्रामस्थांनी यात आडकाठी आणल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ग्रामपंचायतीकडून केली जाईल असा चुकीचा ना हरकत दाखला तत्कालीन सरपंच अलका शंकर ढाकूळ यांनी या कंपनीला दिला होता.

     नवनिर्वाचित सरपंच विनोद सुर्वे यांनी या प्रकाराची तक्रार केल्यानंतर याची दखल घेत स्वतः गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी जामगांव ग्रामपंचायत मध्ये जाऊन दप्तर तपासणी केली. तसेच तत्कालीन सरपंचांनी याबाबत खुलासे सादर करण्याचे आदेश दिले. यावर तत्कालीन सरपंच अलका ढाकूळ यांनी कोणताही खुलासा दिला नाही. त्यानंतर गटविकास अधिकारी भागवत यांनी २७ फेब्रुवारीला सर्व संबंधित कंपनीचे नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव करून ते रद्द करावेत. तसेच तत्कालीन सरपंच अलका शंकर ढाकूळ यांच्यावर ग्रामपंचायतीची फसवणूक केली म्हणून सरपंच विनोद सुर्वे यांनी गुन्हा दाखल करावा असा स्पष्ट आदेश दिला आहे.

डोंगरावर उत्खनन व वृक्षतोडीमुळे गावाला धोका – विनोद सुर्वे, सरपंच

     या खाजगी कंपन्यानी डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून उत्खनन केलेले आहे. यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदललेले आहेत. जामगावला यामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. शेतात जाण्यासाठी स्थानिक नागरिकांचे रस्तेही अडविण्यात आलेले आहेत. तर कंपनीने प्रवेशव्दारावरच सुरक्षारक्षक तैनात ठेवलेले आहेत. वेळोवेळी वनविभाग, महसूल विभाग यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देण्यात आलेले असल्याचे सरपंच विनोद सुर्वे यांनी सांगितले.

ग्रामस्थांशी चर्चा करूनच निर्णय – अलका ढाकूळ, माजी सरपंच

     हा रस्ता टाटा पॉवर कंपनीच्या मिळकतीमधून जात आहे. या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. टाटा कंपनीकडून परवानगी घेऊन शासकीय निधी वापरून हा रस्ता करण्यात आला आहे. कंपनीला रस्ता देण्यासंदर्भात झालेले निर्णय हे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थं यांच्याशी चर्चा करूनच केलेले आहेत, असे माजी सरपंच अलका शंकर ढाकूळ यांनी सांगितले.

..........................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)