"सर्व गुणसंपन्न - मुळशी" पुरस्कार प्रदान करण्याची होतेय मागणी
पौड : किती आले, किती गेले! मात्र जादूची कांडी असलेले ते मात्र
स्थितप्रज्ञ राहिले! हो, मुळशीतल्या
महसुलमधील एका कर्मचाऱ्याकडे जादूची कांडी असल्याने भल्या भल्याना जे जमलं नाही ते
त्या कर्मचाऱ्याने लीलया करून दाखवले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला "सर्व
गुणसंपन्न-मुळशी" असा पुरस्कार प्रदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तशा
आशयाचे निवेदनच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने ही मागणी केली
असून यामुळे मुळशीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एक नव्हे तर तब्बल दोन तहसीलदार जाऊन तिसरे
तहसीलदार आले. दोन नायब तहसीलदार जाऊन तिसरे नायब तहसीलदारही आले. तसेच एक
प्रशिक्षणार्थी अप्पर तहसीलदार मॅडम देखील येऊन गेल्या. आजूबाजूचे अनेक कर्मचारी व
अधिकारी बदलले. एवढंच काय कोरोना सारखा महाभयंकर रोग आला आणि गेलासुद्धा. मात्र त्या
कर्मचाऱ्याने मुळशी महसूलमध्ये आपले नाव व खुर्ची ६-७ वर्ष झाले कोरून ठेवले आहे.
त्यामुळे या कर्मचाऱ्याकडे अशी कोणती जादूची कांडी आहे, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून
येते.
बदलीचा आदेश
येऊनही परत मुळशीलाच थांबण्याची लीला
बरोबर एक वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट २०२४ रोजी या कर्मचाऱ्याच्या बदलीचा आदेश निघून हवेली उपविभागीय कार्यालयात बदली झाली होती. मात्र पुन्हा १० सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा दुसरा आदेश निघून हवेली उपविभागीय कार्यालयाऐवजी पुन्हा मुळशीच्या बदलीचा आदेश निघाला. आजतागायत हा व्यक्ती मात्र एकाच जागेवर अजेय (ज्याला पराजित करता येत नाही असा) राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी या कर्मचाऱ्याची पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे या कर्मचाऱ्याला सर्वगुणसंपन्न पुरस्कार देण्याची उपरोधीकपणे मागणी केली आहे.
फाले यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे
की, या कर्मचाऱ्याकडे खास वैशिष्ट्ये आहेत. ७-८
वर्ष एकाच ठिकाणी, एकाच जागेवर राहून विक्रम
केला आहे. एक वर्षापुर्वी काही जणांचा व सोबत यांचा बदलीचा आदेश आल्यावर पुन्हा मूळ ठिकाणीच लगेच बदलीचा दुसरा स्वतंत्र व एकट्यासाठी आदेश या
कर्मचाऱ्यासाठी काढण्यात आला. सामान्य जनतेला हा कर्मचारी भेटत नाही. तो त्याच्या
कार्यशैलीचा भाग नाही. वेळेचे बंधन नाही, पाहिजे तेव्हा
कार्यालयात येणे व जाणे चालू असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लोकप्रियता ठेवण्यात
यशस्वी. खरंच या व्यक्तीची गरज तालुक्याला आहे की आणखी कोणाला, हा प्रश्न पडला आहे. अजेय म्हणून हा व्यक्ती
खरोखरच पावला असून त्याचे कोणीही काहीही बिघडवू शकलेले नाही. त्यामुळे अशा
अभूतपूर्व, अद्वितीय अधिकाऱ्याचा
गौरव करणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने केलेल्या या कर्मचाऱ्याच्या तक्रारी खऱ्या असून कार्यालयात साडेअकरा कधी बारा, साडेबारा असे ते येत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यांना कधी जाब विचारला गेला की नाही याबद्दल माहिती नाही. पण त्यांच्याकडे वजनदार खातं असल्याने तसेच मोठमोठ्या धनाढ्य व्यवसायिकांशी संबंधित असल्याने त्यांचा रुबाब काही औरच आहे. मात्र त्यांनी केलेली किमया भल्या भल्या तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच कोणालाच जमली नाहीये.
प्रशासनाने या कर्मचाऱ्यावर एवढी मेहेरबानी का केलेय, हे मात्र नागरिकांना व कोणालाच समजत नाहीये. एकाच ठिकाणी, एकाच टेबलावर प्रशासकीय सेवेत अनेक वर्ष कार्यरत राहणे योग्य आहे का, असे सुजाण नागरिक विचारत आहेत.
..............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.