पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये प्रा.दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) यांची अध्यक्षपदी तर मुळशीच्या सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सर्व संचालक मंडळ निवडणुकीसाठी बँकेकडे रवाना झाले. त्यांनंतर प्रक्रिया पार पाडून ही निवडणूक पार पडली. या निवडीने इच्छूकांच्या दांड्या पडल्या असून धक्कातंत्राने अध्यक्षपद निवडले गेले आहे. 
          पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी - १७, काँग्रेस - ०२, भाजप - ०२, असे सदस्य निवडून आले आहेत. एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीकडून अनेक जण अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक होते. अध्यक्षपदासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात ही नावं चर्चेत होती. मात्र यामध्ये प्रा.दिंगबर दुर्गाडे यांचं नाव निश्चित झालं तर उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. प्रा.दिंगबर दुर्गाडे यांनी यापूर्वी जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर चांदेरे यांनी पहिल्याच प्रवेशात उपाध्यक्ष पद मिळवलेलं आहे. (सुनील चांदेरे यांना हिंजवडी टाईम्सकडून शुभेच्छा!)
         सुनील चांदेरे हे विद्यार्थी दशेपासून ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्यावर प्रेरित झाले. तेव्हापासून ते  आजतागायत राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मुळशी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षाला उज्जवल यश मिळवून दिले. त्यांनंतर भोर विधानसभा अध्यक्षपदावर प्रभावी काम करत असताना त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उमेदवारी मिळाली. (हिंजवडी टाईम्स कडून प्रा.दुर्गाडे व सुनील चांदेरे यांना शुभेच्छा). चांदेरे हे पक्षाशी एकनिष्ठ असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी विश्वास दाखवला. मुळशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभल्याने ते मोठ्या फरकाने विजयी झाले. प्रभावी वक्तृत्व ही त्यांची ओळख असून आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने ते सभा गाजवण्यात यशस्वी ठरतात. त्यांच्या निवडीचा मुळशी तालुक्यात जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. 

........................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)