एमआयडीसीच्या मिळकतींची वसूली १००% ग्रामपंचायतीकडून करण्यात यावी, अशी शिफारस करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
हिंजवडी : हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसीच्या मिळकतींच्या करांची वसुली ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात यावी, या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले. हिंजवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ४६ मिळकती आहेत. त्यांच्या करांची वसुली ग्रामपंचायतीकडून होण्याची मागणी ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ही करवसुली ग्रामपंचायतकडून होण्यासाठी हिंजवडी ग्रामपंचायतने मुंबई उच्च न्यायालयात ग्रामीण विकास विभागाचे सचिव व इतरांविरुद्ध दिवाणी याचिका दाखल केली आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने या करांची वसुली एमआयडीसी कडून करण्याकरिता ७ ऑगस्ट २०२० पर्यंत स्थगिती आदेश दिला आहे. तरीदेखील महामंडळाकडून करांची वसुली चालू असल्याने ग्रामपंचायतीला ५०% च कर जमा होणार आहे. त्यामुळे हा कर १००% ग्रामपंचायतीकडून वसूल करण्यात यावा, अशी शिफारस करण्याची मागणी खासदार सुळे यांच्याकडे हिंजवडीकरांनी केली आहे.
करवसुली १०० टक्के ग्रामपंचायतीकडून करण्यात यावी या मागणीचे निवेदन देताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, हिंजवडीचे माजी सरपंच दत्तात्रय साखरे व सागर साखरे, एम आयडीसी अधिकारी मिलिंद टोणपे, प्रशासक सुनील जाधव, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर, बाळासाहेब तापकीर उपस्थित होते.
एमआयडीसीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला जागा आरक्षित केली, हस्तांतर बाकी
दरम्यान एमआयडीसीने हिंजवडी-माण-म्हाळुंगे ग्रामपंचायतींच्या मागणीनंतर जिल्हा परिषदेने एमआयडीसीकडे या प्रकल्पासाठी जागेची मागणी पत्राद्वारे केली होती. यावर एमआयडीसीेने उत्तर म्हणून फेज 3 मधली 5 एकरची जागा आरक्षित करत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे (कोणतेही फोटोसेशन या पत्र देतेवेळी झालेले नाही). हे पत्र व त्यासोबत जागेचा नकाशा थेट जिल्हा परिषदेला दिला असून आता जिल्हा परिषदेने तातडीने हालचाल करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही जागा हस्तांतर करून घेणे भाग आहे.
अद्याप जागा हस्तांतर झाली नसली तरी ती हस्तांतर होण्यासाठी सर्व अनुकूलता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात या तीनही ग्रामपंचायती तसेच आजुबाजूच्या काही ग्रामपंचायती तसेच एमआयडीसीचाही घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच यामुळे ग्रामपंचायतींचा कचरा संकलनाचा लाखोंचा खर्चदेखिल वाचणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील बातमी वाचा.
मुळशीत लवकरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होणार
......................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)