उर्वरीत एका व्यक्तिच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा
बावधन : येथील कोरोना बाधित हॉटेल चालकाच्या संपर्कातील ९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत १ व्यक्तिच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा असल्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावतीने अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. कोरोनाबाधित हॉटेल चालकाच्या पत्नीसह कुटूंबातील सदस्य व वेटर लोकं असे एकुण ९ जण निगेटीव्ह आल्याने बावधनकरांना दिलासा मिळाला आहे.
२४ तारखेला बावधन, ता.मुळशी येथील एक हॉटेलचालक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर संबंधित परिसरात प्रशासन व ग्रामपंचायतकडून खबरदारी घेऊन त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
बावधन हे कोथरूडच्या लगत असलेलं आयटीएन्सचं राहण्याचं आवडतं ठिकाण. येथे एक हॉटेल चालक कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. संबंधित हॉटेल चालक हा या लॉकडाऊनच्या काळाता तो थोडासा शिथिल झाल्यानंतर पार्सलची सेवा पुरवत होता. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी तो पुणे शहरात येत जात होता. शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागात जात असल्याने त्याला तेथील संपर्काच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाली असल्याचे बोलले जात होते आणि ते तसे असुही शकते. मात्र त्याला लक्षणं दिसू लागताच दवाखान्याच नेऊन त्याची तपासणी केली असता कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने पार्सलमुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे धाबे दणाणले होते. १० पैकी ९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने मात्र त्यांना थोडा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
तथापि बावधनमध्ये ग्रामपंचायत व महानगरपालिका प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक घराठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहे. यावेळी सरपंच पियुषा दगडे यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकांना आपल्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळावे, हॅंड सॅनिटायझर तसेच हॅंड वॉश वापरून हात स्वच्छ करत रहावे. ग्रामपंचायतकडून सर्व ते सहकार्य नागरिकांना केले जाणार असून बावधनमध्ये कोरोनाला रोखण्यास शर्थीचे प्रयत्न करणार आहोत.
नगरसेवक किरण दगडे म्हणाले की, बावधनमध्ये पुरेपुर उपाययोजना राबवत आल्यानेच एवढे दिवस बावधन कोरोनामुक्त राहिले. जो पहिला रूग्ण सापडला तो ही केवळ पुणे शहरातल्या हॉटस्पॉट क्षेत्रात जात येत असल्यामुळे कोरोनाबाधित झाला. त्याच्या संपर्कातील लोकांनी क्वारंटाईन केले असून पुढील ९ दिवस त्यांची खबरदारी घेणार आहोत. बावधनला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी औषध फवारणी, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप असे विविध उपक्रमही राबवले आहेत.