तहसीलदारांकडून अपेक्षा, मुळशीत विजय कुमार चोबे यांनी स्वीकारला पदभार
पौड : नाट्यमय
घडामोडीनंतर तब्बल दीड महिन्यानंतर मुळशीला नवे तहसीलदार लाभले आहेत. विजय कुमार
चोबे यांनी मुळशी तहसीलदार पदाची धुरा स्वीकारली असून त्यांचे मुळशीत विविध
मान्यवरांकडून स्वागत केले जात आहे. सर्वसामान्य लोकांची कामं कोणत्याही
वशील्याशिवाय आणि वेळेत व्हावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत असून नव्या
तहसीलदारांना मुळशीकरांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयकुमार चोबे यांनी ३० सप्टेंबर २०१९
रोजी महसूल विभागात सेवा सुरू केली. यापूर्वी त्यांनी मुंबई कोकण विभागातील
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), वांद्रे (पूर्व)
येथे तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळला होता. तत्पूर्वी त्यांनी हवेली तालुक्यात
देखील परिक्षाविधीन अधिकारी म्हणून काम केले आहे.
मुळशी तालुक्यात गेल्या दीड
महिन्याभरापासून तहसीलदार पद रिक्त होते. या काळात प्रभारी तहसीलदार म्हणून जयराज
देशमुख कार्यरत होते. मात्र, कायमस्वरूपी
तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली होती. ती कामं आता पूर्णत्वास
जाण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
आता विजयकुमार चोबे यांची नियुक्ती
झाल्यामुळे मुळशी तालुक्यातील प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणार असल्याचे
चित्र दिसत आहे. “मुळशीतील नागरिकांच्या
समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार,” असे चोबे यांनी
यावेळी सांगितले.
प्रशासनाच्या अपेक्षांना आणि नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरावं लागणार नव्या तहसिलदारांना
यापूर्वीचे तहसीलदार रणजित भोसले यांना त्यांनी दिलेल्या एका निकालावरून निलंबित केले गेले. त्यांची प्रतिमा मुळशी तालुक्यात चांगली होती, त्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे नवीन आलेल्या तहसीलदारांना प्रशासनाच्या अपेक्षांना सामोरं जावं लागणार आहे.
त्याचबरोबर लोकांचा विश्वास जिंकावा लागणार असून दोन्ही गोष्टींचा ताळमेळ
घालण्याचं कसब चोबे यांना दाखवावं लागणार आहे.
तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांची कामं
कोणत्याही वशील्याशिवाय आणि वेळेत होताना पहायची आहेत. १५५ दुरुस्ती हा मोठा गहन
प्रश्न आहे. रेशन कार्ड तसेच पुरवठा विभागातील कामकाजाचे नियमन-वितरण व तक्रार
निवारण, रेकॉर्ड रूममधील कामं, जागेंच्या संदर्भातली कामं, संजय गांधी निराधार योजनेतील कामं, निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकता, मुळशीत अनेक ठिकाणी चाललेले अवैध उत्खनन, महसूलमधील कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती, आपत्ती व्यवस्थापन आदी अनेक विषयांवर नव्या
तहसीलदारांना प्रभावी काम करावे लागणार आहे.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.