पुण्याला मुळशीचे ९ टीएमसी पाणी देण्याचा घाट ? मुळशीतून होतोय विरोध

मुळशीतली ५२ गावं अजून तहानलेलीच... आधी मुळशीची तहान भागवा, मुळशीकरांची मागणी

पौड : मुळशी धरणाचे चक्क ९ टीएमसी इतके वाढीव पाणी पुणे शहराला देण्याचा घाट घातला जात आहे. मुळशीच्या पाण्यावर पुणे शहराचा पहिल्यापासूनच डोळा आहे. मात्र धरण उशाला असूनही कोरड मात्र घशाला अशी मुळशीत परिस्थिती आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला मुळशीतून विरोध होऊ लागला आहे. मुळशीत ५२ गावं तहानलेली असून आधी मुळशीला वाढीव २ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

         १९ टीएमसी पाणी क्षमता असलेल्या मुळशी धरणातून ९ टीएमसी पाणी पुणे शहराला अतिरिक्त म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रालयात झाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार राहुल कुल, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे हे उपस्थित होते. टाटा कंपनी प्रशासनाशी चर्चा करून हे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

         मात्र मुळशीकर नागरिकांनी याला कडाडून विरोध केला आहे. मुळशी तालुक्यातच ५२ गावं अनेक वर्षांपासून तहानलेली असून मुळशी प्रादेशिक टप्पा क्र.१ पूर्वी झालेले आहे तर जलजीवन मिशन अंतर्गत टप्पा क्र.२ चे काम चालू आहे. यासाठी मुळशी तालुक्याला अतिरिक्त २ टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी गेले अनेक वर्षे नागरिकांनी लावून धरली आहे. ती मागणी पूर्ण होत नसताना पुणे शहराला अचानक चक्क ९ टीएमसी पाणी वाढीव देण्याचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आलाय.

         एकतर मुळशीत प्यायला पाणी पुरेना, शेतीलाही पुरेना, मग पुणे शहराला आधी पाणी देण्याचा घाट घालून तहानलेल्या मुळशीकरांच्या डोळ्यादेखत पाणी पळवायचा प्रयत्न चालू आहे. यासंदर्भात मुळशीला २ टीएमसी वाढीव पाणी मिळावे ही मागणी लावून धरलेल्या माजी सभापती रवींद्र उर्फ बाबा कंधारे यांनी तहसीलदार विजयकुमार चोबे यांना निवेदन देऊन विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात बैठक घेऊन मुळशीची पाणी समस्या सोडवणार असल्याचे कंधारे यांनी सांगितले.

         पुणे शहराला ९ टीएमसी पाणी देण्याच्या विरोधात तहसीलदार चोबे यांना निवेदन देतेवेळी बाबा कंधारे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद गटनेते शांताराम इंगवले, यशवंत गायकवाड, बबन धिडे, ज्ञानेश्वर साठे, कालिदास गोपालघरे, राजेंद्र नाकते, शंकर मारणे आदी उपस्थित होते.

...............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k