पुणे : भुकूम, ता.मुळशी येथील हगवणे परिवारातील सून वैष्णवी हगवणे प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असताना तिचा खून केल्याचा संशय व्यक्त करत हगवणे परिवाराविरुद्ध खुनाचा गुन्हा वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. अनिल कस्पटे यांनी एका वृत्तवाहिनीवर याबद्दल लाडकी बहीण म्हणणाऱ्यांनी माझ्या वैष्णवीला न्याय द्यावा, अशी आर्त स्वरात विनवणी केली आहे.
मुळशीतील प्रतिष्ठित राजकीय घराणे असलेल्या राजेंद्र हगवणे कुटुंब या घटनेमुळे चांगलेच गोत्यात आले आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिची आत्महत्या झाल्याचे १६ मे रोजी उघड झाले होते. तिचा मृतदेह बावधन येथील एका खाजगी रुग्णालयातून ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता. वैष्णवीच्या अंगावरील जखमा व खुणा पाहून वैष्णवीचे वडील व नातेवाईकांनी हा निर्णय घेतला होता. तदनंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा ठपका ठेवत कस्पटे यांनी गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यात आरोपी असलेला वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सासरे असलेले राष्ट्रवादीचे मातब्बर नेते राजेंद्र हगवणे तसेच राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष तथा वैष्णवीचा दीर सुशील हगवणे हे दोघे मात्र पोलिसांना काल सापडले आहेत. स्वारगेट पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या तिच्या वडिलांनी एका वृत्त वाहिनीवर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे, रोहिणी खडसे, आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया, शिवसेनेच्या सुषमा अंधारे, भाजपच्या मृणाल पेंडसे यांना आवाहन केले की, लाडकी बहीण सगळे म्हणतात, मग माझ्या वैष्णवीला लाडकी बहीण समजून तिला न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अतिशय भावुक होऊन केली आहे.
वैष्णवीचे लग्न २ वर्षांपूर्वी शशांक राजेंद्र हगवणे याच्याशी धुमधडाक्यात लावून देण्यात आले होते. अतिशय नावाजलेल्या आणि उच्चभ्रू मंगल कार्यलयात राजेशाही पद्धतीने तसेच लाखोंची फॉर्च्युनर कार, ५१ तोळे सोने, चांदीची भांडी अशा थाटात लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या माहेरी अनेक कारणांसाठी पैशांची सारखी मागणी होत असल्याचा आरोप कस्पटे यांनी केला आहे. व त्यासाठी तिचा वेळोवेळी छळ करून तिला मारण्यात येत असे, असेही कस्पटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. छळ करून तिला मारण्यात आल्याचा आरोप होताच मुळशीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तर याबाबतीत अनेक तर्कवितर्क याबाबतीत नागरिकांमध्ये बोलले जात आहेत.
महाराष्ट्रभर या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा चालू असताना माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट केले जात असताना, पवार यांनी मी कोणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक आहे का असे म्हणत हगवणे यांना सर्वच पदावरून काढून टाकले असल्याचे जाहीर केले. तसेच या प्रकरणात आरोपींवर कठोरपणे पोलिसांनी कारवाई करावी, असे पोलिसांना सांगितले असल्याचे सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या हगवणे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असलेले कै.हगवणे यांचा त्या नेहमी आशिर्वाद घेत असत. त्या कुटुंबात असे घडल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर या प्रकरणात कोणीही असो, त्यांची गय करू नये व कठोरात कठोर कारवाई करून वैष्णवीला न्याय मिळवून देऊ असे जाहीर केले.
दरम्यान, मयत वैष्णवीच्या ९ महिन्याच्या लहानग्याला अज्ञात व्यक्तिमार्फत वैष्णवीच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. याबद्दल दुःखात देखील छोटासा आनंद वैष्णवीच्या माहेरच्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसला. लहानग्याचा निरागसपणा पाहून संपूर्ण महाराष्ट्र हेलावला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यात हाय प्रोफाईल प्रकरण ठरत असताना वृत्तवाहिन्यांवर सातत्याने त्याबद्दल बातम्या प्रसारित केल्या जात आहे. वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे. तर या प्रकरणात अनेक नामवंत व्यक्तींनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)