उत्पन्न दाखल्याच्या अटीची मुदतवाढ करून हयातीचे व उत्पन्नाचे दाखले तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी
पौड : विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी युवासेना आक्रमक झाली आहे. विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना ३० जून पर्यंत उत्पन्न दाखले जमा करावेत अन्यथा १ जुलै पासून अनुदान स्थगित करण्यात येईल असा आदेश मुळशीच्या तहसीलदार यांनी काढला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर टांगती तलवार असून युवासेनेचे याविरोधात मुळशी तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवासेनेच्या वतीने तालुका युवा अधिकारी राम गवारे आणि दत्ता झोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील विशेष सहाय्य योजनामधील संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन उपक्रम, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन उपक्रम आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ होत असतो. त्यातून तालुक्यातील निराधार वृद्ध व्यक्ती, गरीब, अंध, अपंग व शारीरिक, मानसिक आजारानं त्रस्त व्यक्ती असे जवळजवळ ४ हजार लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेत आहेत.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.२० ऑगस्ट २०१९ च्या अनुषंगाने सदर लाभार्थी यांनी १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यात सदर उत्पन्न दाखले पूर्तता करणे आवश्यक होते. परंतु मुळशी प्रशासनाकडून मुळशीतील लाभार्थ्यांना सदर शासन निर्णयाची पूर्वकल्पना, जनजागृती ही १ एप्रिल पूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता जूनच्या अखेरीस मुळशी तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना आदेश काढून विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी, श्रावण बाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ व इतर योजना) लाभार्थ्यांना दि.३० जून २०२२ पर्यंत २१ हजार रुपये पर्यंतचे उत्पन्न दाखले तातडीने जमा करण्यास सांगितले होते.
तदनंतर १ जुलै २०२२ पासून सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले असून यामुळे इतक्या कमी वेळेत हे दाखले जमा करणे अशक्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दरमहा शासनाकडून मिळणारे लाभ बंद झाले आहेत. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तालुका स्तरावर उत्पन्न दाखल्याची मुदतवाढ करून मंडल निहाय शिबीरे लावून तातडीने उत्पन्न दाखले आणि हयातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी युवासेना मुळशी तालुका यांच्याकडून करण्यात आली.
याप्रसंगी शिव सहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, माजी तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, शिवसेना युवा नेते अमोल शिंदे, उपतालुका समन्वयक विष्णू ढोरे, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, महिला आघाडीच्या सल्लागार सोनाली बोंन्द्रे, उपतालुका संघटिका सुमन जोरी, बाळासाहेब नरवडे, प्रसिद्धी प्रमुख संतोष टेमघरे, पंकज धिडे, मारुती धनवे, मयुर रानवडे, यश पिंगळे आदी शिवसैनिक तथा युवासैनिक उपस्थित होते.
सदर मागणीची तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने दखल घेऊन प्रशासनाला तूर्तास तूर्त कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कागदपत्रांच्या पूर्तता शासनस्तरावर लवकरात लवकर करण्यात येऊन सर्व शासकीय अनुदान पूर्ववत सुरू करण्यात येतील असे सांगितले.
........................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)