सुस गावात वीजेची तीव्र समस्या, नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

वीस वर्षांपासून कोणताही ठोस बदल नाही, महावितरणचे सतत दुर्लक्ष

सुसगाव : पुणे शहरालगत असलेल्या सुस गावातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वीज समस्येने हैराण झाले आहेत. वारंवार वीजेचा लपंडाव चालू असल्याने नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांना नकोसे झाले असून सुस ग्रामस्थ व रहिवासी याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

     सुस येथील वाढती लोकसंख्या, वाढती घरे, वाढलेला प्रचंड व्यापार याचा मोठा पसारा झाला असून वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र येथील वीज वितरण यंत्रणा वीस वर्षांपासून आहे तशीच जुन्याच अवस्थेत आहे. महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील वीज वितरण यंत्रणेत वारंवार बिघाड होत असून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.

     एकाच ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा दुप्पट कनेक्शन जोडल्याने लाईट दिवसातून अनेक वेळा जाते. कधी-कधी संपूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन, विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि व्यावसायिक कामे यावर मोठा परिणाम होत आहे.

     सध्या वीज पुरवठ्यासाठी जे पोल, ट्रान्सफॉर्मर आणि वायरिंग वापरली जात आहे, ती जवळपास वीस वर्षांपूर्वीची आहे. त्या काळी गावाची लोकसंख्या केवळ ३ हजार होती. पण आज सुस गाव व परिसराची लोकसंख्या १ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तरीदेखील महावितरणकडून ना नविन ट्रान्सफॉर्मर बसवले गेले, ना पोल बदलले गेले.

     महावितरण कार्यालयात कर्मचारी संख्या अत्यल्प असून, अधिकारीही या समस्येकडे कोणतीही दखल घेत नसल्याचे चित्र आहे. वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही. त्यामुळे नागरिकांना आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने अंत न पाहता या समस्येवर तोडगा काढून उपाययोजना केल्या पाहिजेत.

जर समस्या सोडवल्या नाहीत तर नागरिक संघर्षाच्या भूमिकेत – अनिकेत चांदेरे 

     सुस गावातील वीज संकट ही केवळ एक तांत्रिक समस्या राहिलेली नाही, तर ती आता नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावर घाला घालणारी समस्या ठरत आहे. दररोजच्या वीज खंडितत होण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, वृद्ध आणि सामान्य कुटुंबांना अक्षरशः अंधारात जगावे लागत आहे. महावितरणने यावर वेळकाढूपणा थांबवून तातडीने स्वतंत्र वीज उपकेंद्र, नवीन ट्रान्सफॉर्मर व पोल्स, ओव्हरलोड कनेक्शन कमी करणे, कर्मचारी संख्या वाढवणे,  वीज वेळापत्रक पारदर्शक करणे पुढील उपाययोजना कराव्यात.

    जर लवकरच ठोस कारवाई झाली नाही, तर सुस गावातील जनता संघर्षाच्या मार्गावर जाईल, आणि त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल, असे मत माजी उपसरपंच अनिकेत उत्तम चांदेरे यांनी हिंजवडी टाईम्सशी बोलताना व्यक्त केले. 

...............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k