स्वतंत्र नगरपालिका करा, आयटीतील गावांची रास्त मागणी
हिंजवडी : आयटी परिसरातील गावे महानगरपालिकेत घ्यावीत यासाठी काहींनी प्रयत्न चालू केले असून याला स्थानिक ग्रामस्थांचा पुर्ण विरोध आहे. यापूर्वीच यासाठी विशेष ठराव मंजूर करून तसेच, राज्य सरकारला पत्र व्यवहार करून माण, हिंजवडी ग्रामपंचायतींनी महापालिकेत जाण्यास आपला विरोध दर्शवला आहे. परिसरातील गावे महानगरपालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगरपालिका करा यासाठी या ग्रामपंचायती आग्रही असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा चित्र समोर आले आहे.
हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरातील गावे
महापालिकेत जाणार अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. अनधिकृत बांधकामे, पायाभूत सोयी सुविधांची
कमतरता, वाढते नागरिकरण आणी
बकालीकरण अशी कारणे पुढे करत सदर गावे महापालिकेत घेतली पाहिजे अशी भूमिका काही
नेते मंडळी वारंवार घेत आहेत. मात्र, महानगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा वरील समस्या आणी पायाभूत सोयी सुविधांचा अभाव पहायला मिळत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
परिसरातील ग्रामपंचायती आर्थिक दृष्टीने सधन आहेत. त्यास, पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्लूडी आणी इतर कार्यरत प्रशासकीय यंत्रणांची
प्रामाणिक आणी योग्य साथ लाभल्यास गावांचा अपेक्षित विकास होऊ शकतो असा
ग्रामपंचायतींचा आग्रह आहे. त्यामुळे, आयटीतील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगरपालिका अथवा नगर
परिषद करा अशी आग्रही मागणी वारंवार होत आहे.
माण ग्रामपंचायत हद्दीत आयटीपार्कचा साठ टक्क्याहून अधिक भाग येतो. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामस्थांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत सक्षम आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या इतर प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे आयटी परिसरात मूलभूत समस्या जाणवत आहे. मात्र, त्यासाठी महानगरपालिका हा एकमेव पर्याय नाही. याठिकाणी स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- अर्चना सचिन आढाव : सरपंच, माण, ता.मुळशी
परिसरात वाढती लोकसंख्या पाहता मौजे हिंजवडीसह शेजारील पाच गावांची स्वतंत्र
नगरपालिका करावी. महापालिकेत समावेश होण्यास आमचा तीव्र विरोध आहे. तसा
पत्रव्यवहार शासन दरबारी करण्यात आला आहे. शासनाने ग्रामस्थांच्या भावनेचा
सहानुभूती पूर्वक विचार करावा. स्वतंत्र नगर पालिकेसाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.