मुळशीतल्या पौड ग्रामीण रुग्णालयातली घटना, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी
याबद्दल स्वराज्य
पक्षाने पौड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई
करावी अशी मागणी केली आहे. स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले
यांच्यासह शिवसेनेच्या स्वाती ढमाले, ज्ञानेश्वर डफळ, प्रमोद बलकवडे, नामदेव टेमघरे, किसन फाले व नांदगाव ग्रामस्थ यांनी पौडच्या वैद्यकीय
अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर
माहिती अशी की, नांदगाव (ता.मुळशी) येथील शंकर तुकाराम पेरणेकर (वय
५५) या शेतकऱ्याला काहीतरी शेतात चावले आहे, असे वाटले म्हणून त्याने पौड ग्रामीण रुग्णालय गाठले व
डॉक्टरांना तसे सांगितले. यावर त्याला रुग्णालयात दाखल करून घेत त्यादृष्टीने
उपचार सुरू केले. उपचार चालू असताना संध्याकाळी पेरणेकर यांना मोठे अस्वस्थ वाटू
लागल्याने रुग्णवाहिका बोलवून पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी
स्वतः डॉ.विद्या कांबळे रुग्णालयात पेरणेकर रुग्णासोबत रुग्णवाहिकेतून गेल्या
होत्या. ससूनमध्ये गेल्यावर तेथील डॉक्टरांनी पेरणेकर यांचा मृत्यू झाला असल्याचे
सांगितले. यावर पेरणेकर यांच्या नातेवाईकांनी पौड ग्रामीण रुग्णालयात चुकीचे उपचार
झाल्याचा ठपका ठेवला आहे.
पेरणेकर अस्वस्थ
होताच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज होती. त्यामुळे त्यांचे
नातेवाईक जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्याची विनवणी करत होते. मात्र पौड
ग्रामीणच्या डॉक्टरांनी रुग्णाला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्याऐवजी दूर
पल्ल्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आग्रह धरला. त्यात पौड ग्रामीणच्या
रुग्णवाहिकेला चालक त्याक्षणी उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेची तासभराहून अधिक
काळ वाट पहावी लागली. शिवाय एवढा वेळ जाऊन सुद्धा पौड ग्रामीण रुग्णालयाच्या
डॉक्टरांनी दिवसभरात तयार झालेले वैद्यकीय अहवाल तसेच उपचारासंबंधींचे कागद ससून
रुग्णालयात जाताना सोबत ठेवले नाहीत, ही अक्षम्य चूक केली.
तसेच ससून येथे दाखल
करताना रुग्ण थेट घरून ससूनला आणला असल्याचे सांगितले. पौड ग्रामीण रुग्णालयात
उपचार घेत असताना रुग्णाला आल्याचे नमूद केले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या
उपचारात नक्कीच गडबड झाली असावी असा संशय व्यक्त करत पेरणेकर यांच्या नातेवाईकांनी
याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याची भूमिका घेतली. यावर यासंबंधीचे रुग्णाच्या
बाबतीतले कागदपत्र त्यांनी रुग्णालयाकडे मागितले आहेत.
याबाबत रुग्णालयाला
जाब विचारण्यात आल्या नंतर पौड ग्रामीणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.मीना इसवे व
डॉ.विद्या कांबळे यांनी सांगितले की, पेरणेकर यांनी त्यांना शेतात कायतरी चावले असल्याचे
सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर
त्यांची तपासणी करून वैद्यकीय अहवालात तसे काही आढळले नाही. त्यानंतर त्यांच्यावर
उपचार चालू ठेवले. मात्र सायंकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले व आकडी येऊ लागली.
त्यानंतर त्यांना आम्ही ससून रुग्णालयात घेऊन गेलो व तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे
तेथील डॉक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पेरणेकर यांच्या मृत्युबाबत लेखी तक्रार दाखल करत चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य तो न्याय नाही मिळाला तर, स्वराज्य पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आलेला आहे.
- राजू फाले
अध्यक्ष : मुळशी तालुका महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)