मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना; संतप्त युवकांनी मशिदीच्या काचा फोडल्या

पौडमध्ये तणावाचे वातावरण, पोलिसांकडून शांततेचं आवाहन

पौड : शुक्रवार २ मे रोजी पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्यामुळे युवकांनी संतप्त होऊन रात्री उशिरा पौडमधील मशिदीच्या काचा फोडल्या. त्यामुळे पौडमध्ये तणावाचे वातावरण असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पौड पोलीस शांततेचे आवाहन करत आहेत. 

         याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पौड, ता.मुळशी येथील नागेश्वर मंदिरात शुक्रवार २ मे रोजी  अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. याबाबतीत शिवाजी मारुती वाघवले (वय ३४) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चांद नौशाद शेख (वय १९) याने मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची बीभत्स विटंबना केली. तसेच यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली. या घटनेनंतर चांद शेख याचा वडील नौशाद शादाब शेख (वय ४४) यांनी उपस्थित लोकांना उद्देशून धमकीचे उदगार काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

         तर रात्री उशिरा याबाबतीत पौड पोलीस स्टेशनला कारवाई सुरू असताना काही संतप्त युवकांनी मशिदीच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यामुळे पौड येथील वातावरण तंग झाले आहे. पौड येथील नागेश्वर मंदिर व मशिदीला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झालेल्या घटनेमुळे आज पौड गाव बंद ची हाक देण्यात आलेली आहे.

         या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत असून पोलिस उपनिरीक्षक घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.

गावाबाहेरील मुस्लिमांना मशिदीत येण्यास बंदीचा ठराव अन त्याच दिवशी घटना

         पौड गावामध्ये बाहेरुन येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवाना पौडमधील मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पौड व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेमध्ये हा ठराव झाला. 

         स्थानिक मुस्लिम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी याठिकाणी फक्त स्थानिक मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील. याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लिम बांधवांनी नोंद घ्यावी, असे पौड ग्रामस्थांनी ठरावातून निश्चित केले. 

         याच दिवशी दुपारी हा प्रकार झाला असल्याने वातावरण तंग झाले आहे. पोलीस व प्रशासनाला शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

.............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)