हिंजवडी टाईम्सच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन ताळ्यावर

महसूल कर्मचारी अजय सावंतची अखेर मूळ ठिकाणी रवानगी, स्वराज्य पक्षाने निवेदनातून केली होती मागणी

पौड : जादूची कांडी सदृश अदृश्य हात असलेल्या मुळशी महसूल कर्मचारी अजय सावंत यांची ड्राफ्टिंग ऑर्डर अखेर रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या आधीपासून सावंत मुळशी महसुलमध्ये कार्यरत होते. आता त्यांची मूळ ठिकाणी म्हणजे हवेली महसुलमध्ये महसूल सहाय्यक म्हणून पुढील प्रशासकीय सेवा होणार आहे.

     गेल्या ६-७ वर्षांपासून अजय सावंत मुळशी महसूलमध्ये कार्यरत होते. कोरोनाचा काळ संपला, तीन तहसीलदार बदलले, तीन नायब तहसीलदार बदलले, राज्यात सत्तांतरे झाली, तालुक्यात आमदार बदलले, पण सावंत मात्र एकाच कार्यालयात सेवा देत होते. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सावंत यांच्यासह मुळशी महसुलच्या इतर ५ कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी बदली झाली होती. त्यात सावंत हे हवेली महसूल विभागात रुजू होणार असा आदेश होता. मात्र महिन्याभरातच १० सप्टेंबर २०२४ रोजी ड्राफ्टिंग ऑर्डरवर सावंत यांना हवेली महसूलमधून पुन्हा मुळशी कार्यालयात रुजू करण्यात आले. याच कारणामुळे अजय सावंत हे कालांतराने चर्चेत आले.

     जागरूक असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने सावंत यांची ही कामगिरी हेरली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला या सावंत यांना सर्वगुणसंपन्न पुरस्कार देण्याची उपरोधिक मागणी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी चांगलाच पाठपुरावा केला होता. याबद्दल हिंजवडी टाईम्सने "महसुलच्या कर्मचाऱ्याकडे आहे जादूची कांडी" अशा आशयाचे वृत्त २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मुळशी तालुक्यात चर्चांना उधाण आले होते.

     परंतु एवढं करूनही प्रशासन योग्य भूमिका घेत नव्हतं. सावंत यांना एवढं मोठं अभय का मिळत होतं, कोणाच्या सांगण्यावरून मिळत होतं याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. ड्राफ्टिंग ऑर्डरला वर्ष होऊन गेलं तरी सावंत हे मुळशीतच रुजू होते. याबाबत प्रशासनाला हिंजवडी टाईम्सकडून वारंवार विचारलं जात होतं.

     मग थेट निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना फोनवर विचारणा केली असतात्यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही सावंत यांना अभय भेटत असल्याचे निदर्शनास आले. मग प्रत्यक्ष समोरासमोर भेटून वस्तुस्थिती सांगत ६-७ वर्ष एकाच पदावर असलेला व्यक्ती आगामी जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीवर परिणाम करणार नाही का, असा मुद्दा सांगितला. यावर तुम्ही चांगला आणि योग्य मुद्दा मांडला असून लवकरच कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. तदनंतर 2-4 दिवसांतच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची सावंत यांची सेवा पुर्ववत करण्या संदर्भातल्या पत्रावर सही झाली आहे. त्यामुळे सावंत यांना आता मुळशी ऐवजी त्यांच्या बदली झालेल्या हवेली महसूल येथे रुजू व्हावे लागणार आहे.

     हिंजवडी टाईम्स अन् स्वराज्य पक्षाने कोणत्याही व्यक्तिविरोधात नव्हे तर व्यवस्थेविरूद्ध आणि प्रशासकीय गलथान कारभाराविरोधात आवाज उठवून प्रशासकीय चुक सुधरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळवले. त्याचे अनुकरण समाजात होणे गरजेचे आहे.

मुळशी महसुलच्या त्या कर्मचाऱ्याकडे आहे जादूची कांडी...?

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k