जिकडे तिकडे चहूकडे खड्डेच खड्डे

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्क्रियतेमुळे दरवर्षी या रस्त्याला विघ्न

 

पिरंगुट : नेहमीच येतो पावसाळा, अन नेहमीचे येतात रस्त्यांवरचे खड्डे. जिकडे तिकडे चहूकडे खड्डेच खड्डे अशी दरवर्षीच मुळशी तालुक्याची अवस्था पावसाळ्यात पहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्क्रीयपणा दरवर्षी उघड होत असूनही त्यावर तोडगा निघत नसल्याने मुळशीकरांची निराशा होत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार शंकर मांडेकर यांनी आता यावर ठोस पावले उचलण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.

२५ वर्ष खड्डे न पडणारे रस्ते करू, असे मंत्री म्हटले होते, पण गेल्या ७ वर्षात इथले खड्डे काय संपलेच नाहीत

     भरे पॉवर हाऊस समोरील रस्ता कायम खड्ड्यांच्या गर्तेत राहिला आहे. गेल्या दशकभर किंबहुना त्याहून अधिक वर्षांपासून येथील खड्ड्यांचा रस्ता काय दुरुस्त होईना. २०१८ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काळात तब्बल प्रति किलोमीटर जवळपास ३ कोटी रुपये खर्चून मुळशीत ३ रस्त्यांची तजवीज करण्यात आली होती. त्यात हा रस्ता देखील होता.

     या रस्त्याच्या पुन:र्निर्मितीत वन विभागाच्या अडचणी समोर आल्यानंतर त्या सोडवण्यात राज्य शासनाला आणि संबंधित ठेकेदाराला अपयश आले. परिणामी हा रस्ता कधीच होऊ शकला नाही. आजतागायत हा रस्ता खड्ड्यांच्या गर्तेतच आहे. याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम खाते, संबंधित ठेकेदार, तत्कालीन मंत्री आणि लोकप्रतिनिधी आहेत. आज या रस्त्यावरून प्रवास करताना गाडीची अन शरीराची हाडं खिळखिळी होत आहेत.

     सार्वजनिक बांधकाम खाते दरवर्षी या रस्त्यावर नेटाने खड्डे बुजवत आहे, मात्र या रस्त्याच्या ठेकेदाराला रद्द करून नवा ठेकेदार घेऊन काम करणं या खात्याला अद्यापही जमलेले नाही. या ठेकेदाराचा ठेका काढून टाकण्यासाठी गेले दीड-दोन वर्ष मंत्रालयात पत्र दिल्याचे अधिकारी सांगतात, मात्र हे पत्र पत्रकाराने मागितले की द्यायला तयार होत नाहीत, देतो देतो म्हणून वेळ मारून नेतात. त्यामुळे या रस्त्याचं नक्की काय गौडबंगाल आहे, हे समजायला तयार नाही.

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k