पौड : सख्ख्या भावाचा बायको व मित्राच्या मदतीने खून करून मृतदेह खड्ड्यात पुरणाऱ्या तिघांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. दृश्यम स्टाईल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या तिघांकडून करण्यात आला. मुळशी तालुक्यातील कुळे येथे एका खाजगी फार्महाऊसवर ही घटना घडली असून हे आरोपी तिघे तेथील कर्मचारी आहेत. फार्महाऊस मालकाच्या हुशारीमुळे त्यांना संशय आल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
बायकोचे परपुरूषाशी असलेले अनैतिक संबंध सख्ख्या भावाला समजले. ते त्याने नातेवाईकांना सांगू नये म्हणून सख्ख्या भावाचाच काटा काढण्याचे कृत्य आरोपीकडून करण्यात आले. यासाठी आरोपीने बायकोची तसेच ज्या परपुरुषाशी संबंध होते त्याचीच मदत घेतली हे विशेष. दहाच दिवसापुर्वी गावावरून आलेल्या सख्ख्या भावाचा या तिघांनी गळ्यावर कोयत्याने वार करत खून करून मृतदेह फार्महाऊसच्या आवारात खड्ड्यात पुरला. अंगावर शहारे आणणारी ही घटना कुळे, ता.मुळशी येथे रविवारी 22 नोव्हेंबर उघडकीस आली. संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40 रा.अक्कलकोट, जि.सोलापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा संगनमताने खून करणाऱ्या स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38), विजयकुमार नारायण राठोड (वय 44 ) तिघेही रा. कुळे, ता.मुळशी यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे शहरातील प्रसाद कुलकर्णी यांच्या मालकीच्या कुळे, ता.मुळशी येथील फार्महाऊसवर ही घटना घडली. या फार्महाऊसमध्ये स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार हे तिघेजण केअरटेकर म्हणून काम करीत होते. विजयकुमार आणि अमृता यांचे बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याची अमृताचा पती स्वामीनाथ यालाही माहिती होती. स्वामीनाथचा सख्खा भाऊ संतोष दिवाळीमध्ये अक्कलकोट या आपल्या मुळगावाहून कुळ्याला भावाकडे आले होते. त्यावेळी त्यांना अमृता आणि विजयकुमार यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती समजली. यावेळी संतोषने अमृताला भावाचा संसार उघड्यावर आणू नको, अशी विनंतीही केली होती.
मात्र संतोष गावी गेल्यानंतर बायकोच्या अनैतिक संबंधाची माहिती नातेवाईक, ग्रामस्थांना देईल अशी भिती स्वामीनाथला वाटत होती. त्यामुळे स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार या तिघांनी संगनमताने शुक्रवार दि.13 नोव्हेंबर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री संतोषचा खुन केला. फार्महाऊसच्या आवारात एका बाजूला खड्डा खणून त्यात संतोषचा मृतदेह पुरला. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तसेच याबाबत कुणालाही शंका येऊ नये व काहीही कळू नये याची खबरदारी घेतली.
दोन दिवसांपूर्वी प्रसाद कुलकर्णी आपल्या फार्महाऊसकडे आले. त्यावेळी त्यांनी संतोषची चौकशी केली असता स्वामीनाथ, अमृता, मुले यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्याचवेळी कुलकर्णी यांना संशय आला. रविवार दि.22 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेताभोवती चक्कर मारली. त्यावेळी शेताच्या एका कोपऱ्यात त्यांना घाण वास आला. तेव्हा या तिघांनाही विश्वासात घेवून खरं काय आहे याची माहिती घेतली असता तिघांनीही संतोषचा खून करून त्याचा मृतदेह फार्महाऊसच्या कोपऱ्यात पुरल्याची कबूली दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी पौड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेखा दूधभाते करीत आहेत.
........................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)